सोमवार, २९ डिसेंबर, २००८

नव्या वर्षाचे स्वागत


तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना नव वर्ष सुखाचे आणि समृध्दीचे जावो.
------------------------------------
नव्या वर्षाचे स्वागत, ओल धरते पापणी.
नवा आनंदही आहे, संगे जुन्या आठवणी.

विश्व परिस बाहूंचे दिसे विनविते चला.
जावू धावून रे करू नव्या स्नेहाची बोहणी.

उडे पाखराची जात, तिला नवे काय त्यात.
नव्या आकाशासाठीच चला करुया मागणी.

नव्या नव्याची हाउस, मान्य राहे नऊ दिस.
जुने वर्खण्याला मागू नव्या चैतन्याचे पाणी.

झाले गंगेला मिळाले, वृथा शोक काय त्याचा?
उभा राहुया रांगेत, नव्या प्रश्नांची वाटणी.

नव्या वर्षाचे स्वागत, नव्या स्वप्नांची वेचणी
नव्या उत्साहाने करू, नव्याध्येयाची आखणी.

--भूराम.

रविवार, २८ डिसेंबर, २००८

पिवळाई

वा-याच्या सुरात
मिसळणारी पाने
हिरवाईच्या आशेने
छेडत नवतराणे
स्वर्णझरा
देवून धरा
भोव-यात
गळते
ती सारी
जिवंत
पिवळाई.

--भूराम

शब्दांची वारी -एक जुना प्रयत्न


ही कविता १०-११ वर्षापूर्वी केलेली. पूर्ण नाहिय आणि एकसंध ही नाहिय. मन म्हणाल चला पोष्ट करूया.
--------***----------
शब्द उभारी, शब्द भरारी,
शब्द शिवारी, शब्दांची वारी.

शब्दच कमान, शब्दच बाण,
शब्दच शब्दांचा घेई प्राण.

शब्द चपल, शब्द विकल,
शब्दच शब्दांना सावरतील.

शब्दच सुख, शब्दच दुःख,
शब्दच शब्दांची सावरती भुक.

शब्दच भय, शब्दच लय,
शब्द्च शब्दांची बदलती सवय.

शब्द पुलकित, शब्द सिंचीत,
शब्दच लिहतील शब्दांचे गीत.

शब्दच प्रेम, शब्दच द्वेष,
सदा बदलते शब्दांचे वेश.
--------***----------

शब्द आई, शब्द बाबा,
ओला होतो -ह्रदय गाभा.

शब्द ताई, शब्द भाऊ,
वाटून घेतो प्रत्येक खाऊ.

शब्द सखा, जिवलगा,
एक प्रेमाचा कोवळा धागा.

शब्द नाती, शब्द गोती,
शब्दाविण पुरे न होती.

--------***----------
शब्द पॄथ्वी, शब्द सुर्य,
एक ममता, दूसरे विर्य.

शब्द चंद्र, शब्द तारे,
दुःखातील आशेचे वारे.

शब्द महंत, शब्दात संत,
शब्दच उजळे सारे दिगंत.

शब्द ज्ञान, शब्द जाण,
शब्दाविण हले न पान.
--------***----------

शब्द हात, शब्द लाथ,
असह्य एकच शब्दाघात.

.....अपूर्ण...

--भूराम