देवाजींने तिका
दिला दान देह
रूप दिले तिका
भवा दिला मोह.
देवाजीच्या देहा
बिलगे कापड
नजरांचे फड
नाचवती मढ़
देवाजीच्या देहा
बिलगती नाती
कातळाची माती
तुळशीला जड
देवाजीच्या देहा
टोचले बोचले
वासनांचे हेले
पोसणारी डोकं
देवाजीच्या भवा
घडते रे काय
द्रौपदीची हाय
जग बघे वग.
देवाजी ही तिचा
कर ना सांभाळ
नजरा वंगाळ
गढूळला डोह
देवाजीला मागे
हाडांचे सापळे
मासांचे ते गोळे
शमविना भूक
देवाजीच्या देहा
तिने केले दान
पिंडीतला प्राण
कावळ्यांची ढुकं
-भूराम
४/१८/२०१८
मागे काळोख बांधला
पुढे उजेड सांडला
घेतो प्रवासाची शिधा
जोही आशिष चांगला.
कुठे भागते तहान
कुठे वाटते लहान
भले बुरया अनुभवा
नित गोडवा मानला
आसवांचे मोती केले
ओठा हासू देत ओले
जिणे जगत्या राहाटी
भाता श्वासांचा चालला
रोज सूर्य उगवितो
रोज चंद्र तो कलतो
मावळता काळजाशी
हाच जागर मांडला.
-भुराम , 3/18/2018 Pune
माझ्या घरातले ऊन
तुझ्या दारी मी सांडिले
ओले गाभूळ काळीज
तुझ्या पदरी मांडिले
ओल मायेचे गं तुला
थोडे कोरले मातीला
अलगद त्या उबेत
माझे गुपित पेरले
गेले दोन चार दिस
आले आभाळ भरीस
थेंबा थेंबाने सरींना
तुझ्या मिठीत शिंपले.
उमगले ते तुलाही
दडविले तुही नाही
अंकुरलया श्वास देहा
सुखे जीवन तू दिले.
कसा परिसला साथ
भरविला दूध भात
जीव जीवाचा जीवात
दुडू दुडू ते धावले
गेले दिस गेली रात
रूप तुझे माझी कात
आले पाखराला पंख
दूर देशी ते पांगले.
झालं मोकळं देऊळं
किणकिण ना मंजुळ
तूझ्या हाती माझा हात
दिस मोजत चालले
आता...
डोळं लागलेले दारी
ओढ गोठलेली वारी
दूर देशी गेले मन
पुन्हा कधी ना बोलले
-भूराम
४-मार्च-२०१८