शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

सरकार

आता पुरे रडीचा डाव
जिभेचा तो उतरलाय भाव
राज्य तुमचं माणसं तुमची
फुका पुरा बडेजाव.

नाही राज्य मुंबई पुरतं
बारा कधी मतीत भरतं
तिसरं शेपूट दाबून पळत
कुणा कळेना गाव

केकट केकट डोळे फिरवत
फुगीर तोंड नुसतं ओकत
उष्ट्या पानावरती तिसरंच
जेवून जात राव.

श्वासांचीहि किंमत द्यावी
पोटा दाबून हिम्मत द्यावी
बांधून भोवती कुंपण त्याची
रोजच चोरटी धाव

बघा डोळ्यांच्या काचा तोडून
चला थोड्याश्या टाचा फोडून
व्यवस्थतेच्या ह्या सरणावरती
माणूस जळतो राव.

सरकार,
आता पुरे रडीचा डाव ...

-भुराम

गुरुवार, ११ मार्च, २०२१

इति .. बोध

मला जोडलेल्या तोडलेल्या
ओरखडलेल्या खोडलेल्या
प्रत्येक भावनांना समजून घे
मला समजावून घेण्या पेक्षा
किंवा समजावून सांगण्यापेक्षा ...इति .. बोध

संवेदना, आकाश सारखेच
मर्यादा नसते कसली त्यांना
मुक्त स्वछंदी पाखर उडतात
पण शेवटी तीच थकून, गळून
अस्तिस्त्वहीन, मरून पडतात ...इति .. बोध

काळीज असत धुकं असतं
धुक्यात सगळं अंधुक असत
डोकावून बघू नकोस फारस
जिथं विरळ तिथं कुणीच नसेल
जिथं गर्द तिथं फक्त तूच भासेल ...इति .. बोध

प्रवास, वाट, वाटसरू,भूक
एव्हढाच ते काय माझं विश्व
भूक शमली, वाट सरली ,
वाटसरू निघून गेलेत पुढे 
म्हणजेच प्रवास संपला नाही का ! ...इति .. बोध

-भूराम