सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१९

रुजण्याची वेळ झाली.


तुझी नी माझी मैत्री 
जगण्याची वेळ झाली
सूर्या बसू जरासे का? 
निघण्याची वेळ झाली!
तो बघ तो किनारा 
अस्प्ष्टश्या काजव्यांचा
दे तेज तू तयाला 
जळण्याची वेळ झाली.
ती गोड़ ती मघाची 
किलबिल पाखरांची
बोलू जरा घडीभर 
उडण्याची वेळ झाली.
मी सांगू का तुला रे 
ते दुखणे सावल्यांचे
त्यांच्या मिठीत आता 
घडण्याची वेळ झाली.
तू गेल्यावर आता 
जगणे मला रे काही
जा माणसांत माझी 
रुजण्याची वेळ झाली.

-भूराम
11/11/2019

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१९

चूक तू!

स्पंद तू, गंध तू
मोकळा आनंद तू
मेघ तू, ओघ तू
बोलकी गं धुंद तू
ओह तू!, वाह तू!
हृदयी वेडा मोह तू
की सुखाशी गुंतलेला
सावळा संमोह तू
गोड तू, ओढ तू
काळजाची मोड तू
हलकेच काढलेली
लाजणारी खोड तू
हो सुखाचें सुख तू
हो प्रेमाची भूक तू
देवालाही आवडे जी
छान भोळी चूक तू..

-भूराम

रविवार, ३ नोव्हेंबर, २०१९

मुकुंदी

*****
गोड साखरं ओठाला
मऊ गालाची बासुंदी
माझ्या ऱ्हदयात तुझी
बघ लाडावली बुंदी.
माथी काजळाचा टिळा
भाव डोळ्यातला भोळा
तुला कडेत मी घेतां
जड नथातली चांदी.
ऊब तान्हुल्या मिठीत
तुला गोंजारू दे निट
वेडा काळजात ठोका
साऱ्या जगात आनंदी
माझे सुख लाभो तुला
कधी दुःख ना हो तुला
माय यशोदा मी तुझी
 बाळ माझा तू मुकुंदी
-भूराम
३/११/१९

सुखां

सुखी आसवांचे हासू
डोळा आनंदले आसू
वेड्या लागणं मनाला
हवे काय दे रे पुसू.
बघ कमानी भुवया
त्यात गर्दला तो टिळा
तेज गाली ते साजेसे
लागे चांदव्याला भासू
पदरात गुंजणारी
स्पंदं कैफांची शरारी
ह्याच पाळध घडीला
डोळा लागली रे दिसू.
ईथं थांबरे जरासा
नको होवू वेडापिसा
सुखां, आजचाचं दिस
गप्पा मारू थोडं बसू.

-भूराम
(2/11/2019)