प्राण,
पोखले पोखले
नाद नदीच्या किनारी
सांज धुळीची निखारी
उजवले आसमंत.
मन,
झरता झरता
चांद अलवार झाला
ओघ नसता कशाला
रुजवले आसमंत
क्षण,
नादले नादले
रात गाभुळत्या वेळा
चांद अबिरीं खुलला
सजवले आसमंत.
तन,
उरले नुरले
नाही जाणीव कशाची
ओढ चांदणी स्मरांची
भिजवले आसमंत
ऋण,
कळते छळते
गेल्या काळाचे ते होते
तुझ्या मिठीतले नाते
निजवले आसमंत
-भुराम
२/३/२०१८