शुक्रवार, ३ एप्रिल, २०१५

कल्हई.


आत्मे नदीत होती 
ती चांद दिव्यांची नक्षी.
का पंखांवरती अलगद 
स्वप्न ठेवते पक्षी!
तो अंधाराशी विलगा 
नाद होतसे पैंजण 
का दुरात साजरे डूलती 
नक्षत्रांचे हिरकण.
आभाळ पांघरू आता 
की ऊब सावळी दुलई,
क्षितिजाच्या रंगमहाला 
ही कोण लावी कल्हई.
-भूराम

मंगळवार, ३१ मार्च, २०१५

गाभण

रित्या गाभण मनाची कशी पहुडली वाटं
दूर क्षिताजाशी तीचं दिसे किलकिल नातं ।

माझा पाङ्गुळता मेणा  रोज  ढकले एव्हढा
कसा भन्नाट भोवरा  त्यात घिरघिर वेढा
अश्या साजण सुखाची झाली ओघळती कातं। … दूर क्षिताजाशी तीचं दिसे किलकिल नातं. ।

रुणझुण साउल्यांची क्षणाक्षणाच्या वेटोळी
प्राण परिघात घेता उन्हं टिचते काचोळी.
गंज माखल्या  मनाची जरा पोखारावी जातं । … दूर क्षिताजाशी तीचं दिसे किलकिल नातं. ।

गोल शुन्याचा भोपळा, गोड काळजाचा लळा
किती मिठीत गोवल्या सांज गाभुळत्या कळा.
आले जन्माला कधीना सदा ठरलेला घातं । … दूर क्षिताजाशी तीचं दिसे किलकिल नातं. ।

वारा आडोशी घेवू दे सोड पदराची गाठं
आला झिम्मड पाऊस दिसे भिजलेली पाठ.
आता विरघळ  सारी चिंब बरसली रातं  । … दूर क्षिताजाशी तीचं दिसे किलकिल नातं. ।

निळा झाला त्वचेतला वेड्या सुखाचा प्रकाश
दवातल्या निळितला कुंद उगवला श्वास
झुंजूमुंजू विघुरली उब दुलई पहाट ।
दूर क्षिताजाशी तीचं आता किलबिल नातं. ।

-भूराम
मार्च ३१, २०१५