शनिवार, १५ फेब्रुवारी, २०१४

पँडोरा

अनुमेघ मनाची ओंजळ
की संकर्षातील  मृगजळ,
आत्म्यात दाटुनी येता,
ती भवतालाची  पडझड.

हा स्वर उरांनी भरतो
कंठात कणभर मुरतो
आक्रोश दाटुनी येता,
ती  विस्ताराची तडफड.

आवेश सुरांचा होतो
तो मेघ मेघ अत्तरतो,
ओथंब दाटुनी येता,
ती स्पंदरवांची वर्दळ.

हा सांज  कवीचा ऱ्होरा
की बंद कुपी पँडोरा,
गहिवर दाटुनी येता,
उठे काहुरांची वादऴ.

-भूराम
2/15/2014