शुक्रवार, १६ मार्च, २०१२

...भ्रम...

मन बांधलं मानसी चांद तेव्हडा घेवू दे.
रान पेटल्या दिशेला आज सयेच येवु दे.

ॠण कुणाचे सांगणे नाही देवळाची ओढ
पाय ठेवता मातीला आसवांना होते जड
काळजाचा डोह होतो, प्राण कोसळून जातो
थांब कुणाला म्हणू मी, पापणिला ह्या लवू दे.

प्रेम पडले निजेला नाद करते घुंगुर
शोध डोळ्यामधे आता देह माखला शेंदूर.
फ़ुल वाहिलेली कुणी, कुणि केलेला नवस
दान कुणाला मागु मी दान मलाच होवू दे.

इथे गेले दूर गीत, जिणे झालेले शापीत
रोज स्वप्नातील सांग कोण घडवी अवधूत.
देह माझा हा पडू दे, आज मोकळे रडु दे
शब्द भ्रमातिल माझ्या गीत येव्ह्डे गाउ दे.

स्पंद पोखरते माया, धुर पोखरता श्वास
माझ्या परिघात मला किती घडतो प्रवास.
निळ माथ्याची गळू दे, धुळ पायाची ढळू दे
चांद तेव्हडा घेवू दे, चांद तेव्हडा घेवू दे.
रान पेटल्या दिशेला आज सयेच येवु दे.
रान पेटल्या दिशेला आज सयेच येवु दे.

-भूराम १७-०३-२०१२